खान्देश टाइम्स न्यूज | ३० डिसेंबर २०२३ । जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तरुणाकडून गावठी बनावटीचे दोन पिस्तूल आणि १५ जिवंत हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नमीर खान आसिफ खान (वय-१८) रा.काट्या फैल, शनिपेठ जळगाव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या काट्याफाईल परिसरात नॅशनल जीमजवळ राहणारा संशयित आरोपी नमीर खान आसिफ खान याच्याकडे २ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुस घेऊन असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. पोलीस निरीक्षकांनी सहाय्यक फौजदार निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश चौभे, कर्मचारी विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, संदीप सावळे, किरण चौधरी, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, लक्ष्मण पाटील यांच्या पथकाला रवाना केले.
पथकाने शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता काट्याफाईल परिसरात कारवाई करत संशयित आरोपी नामीर खान याला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळून गावठी बनावटीचे २ पिस्तूल आणि १५ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहे.