जळगाव ;- जिल्ह्यातील भुसावळ येथील ईगल स्पोर्टिंग क्लब द्वारे आठ वर्षाचा असताना फुटबॉल खेळून महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय पातळी पर्यंत नाव उंचावणारे पोलीस दलातील कॉन्स्टेबल भास्कर पाटील यांची नुकतीच शासनाने पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती केली असल्याने या फुटबॉल खेळाडूचा जळगाव जिल्हा फुटबॉल संघटना व खेळाडू तर्फे पोलीस कवायत मैदान जळगाव येथे एका छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा संघटनेचे सचिव फारुक शेख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी संघटनेचे सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक मनोज सुरवाडे, सेंट्रल रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडू उज्ज्वल काळे, भुसावळचे आबिद शेखवआदींची उपस्थिती होती.
भास्कर पाटील हे खेळाडू म्हणून पोलीस दलात भरती झाले व वयाच्या ५० वर्षापर्यंत त्यांनी क्रीडांगण गाजवले त्यानंतर एक उत्कृष्ट संघटक व मार्गदर्शक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आजही ते जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे क्रियाशील असे संचालक आहे.
जिल्ह्याच्या संघातील फुटबॉल खेळाडूंना कधीही कोणत्याही प्रकारची मदत करण्यात ते नेहमी अग्रेसर असतात व खेळाडूंसाठी शारीरिक, मानसिक व आर्थिक सहकार्य करीत असल्याची बाब जिल्हा संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी व्यक्त केली.
भास्कर पाटील यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना उपस्थित खेळाळूना महत्वपूर्ण अशा टिप्स दिल्या व खेळाडूंनी आपल्या खेळात सातत्य व चिकाटी पण ठेवावा. नेहमी जिंकण्यासाठी खेळू नये हरल्यावर नाउमेद होऊ नये व आपले उद्देश साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावे. संघटनेने जो सत्कार केला त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहू इच्छितो अशा भावना सुध्दा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल मोहसिन यांनी तर आभार मनोज सुरवाडे यांनी मानले .