राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांची मागणी
मुंबई l ६ ऑगस्ट २०२४ l राज्यातील मराठा मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस महमुदुर रहमान समितीने केली होती मात्र राज्य सरकारच्या वतीने अद्यापही आरक्षणावर कुठलीही भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अल्पसंख्यांक समाजाचा होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली.
महाराष्ट्रातील मराठी मुस्लिम समाज हा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. हे महमुदुर रहमान समितीच्या अहवालातून सिद्ध झाले आहे. त्यांच्या शिफारशीनुसार मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे असे सूचित करण्यात आले होते. परंतु आरक्षण राज्य शासनाने काढून घेतले. आज मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी कुठलीच प्रभावी योजना महाराष्ट्रात दिसून येत नाही. हा समाज दिवसेंदिवस मागास होत चालला आहे. अल्पसंख्यांक समाजाचा होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात यावी अशी मागणी जावेद हबीब यांनी केली आहे.
मराठा समाजातील समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारने सारथी, एससी – एसटी समाजाच्या विकासासाठी बार्टी, आरती, महाज्योती अशा प्रत्येक समाजाच्या विकासासाठी संस्था कार्यरत आहे. तर मग महाराष्ट्रातील मराठी मुस्लिमांवर अन्याय का ? असा प्रश्न स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्य सरकारला केला आहे.
महाराष्ट्राची प्रतिमा उंचावण्यासाठी त्वरित मोलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला मान्यता देऊन आर्थिक नीधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महाराष्ट्रात लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असे जावेद हबीब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी रागीब अहमद प्रदेश महासचिव रा.कॉ.पा. (एसपी) आणि अब्दुल बारी प्रदेश उपअध्यक्ष रा.कॉ.पा. (एसपी) (अल्पसंख्यांक) उपस्तिथ होते.