मुंबई वृत्तसंस्था –एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस उलटले आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. त्यातच आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला.त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची नेमणूक करण्यात आली आहे.
शिंदेंच्या राजीनाम्यानंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे ही कायदेशीर तरतूद असते. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी एकनाथ शिंदेंची नेमणूक केली आहे. वरिष्ठांनी बोलावल्यानंतर तिन्ही नेते दिल्लीत जातील किंवा पक्षाचे वरिष्ठ इथं येणार असतील तर इथं बैठक होईल. ही पक्षाची अंतर्गत बाब आहे. त्यावर मी काही बोलणार नाही. तिन्ही नेत्यांनी भाजपाच्या वरिष्ठांकडे निर्णय सोपवला आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रगतीसाठी नवं सरकार काम करेल त्यावर तिघांचे एकमत आहे. एकनाथ शिंदे यांची बिल्कुल नाराजी नाही. तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मान्य असेल हे वरिष्ठांना एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे कळवलं आहे अशी माहिती त्यांनी दिली.