
देशी पिस्तूलसह तरुण जेरबंद
LCBची धडक कारवाई; ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
जळगाव – स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाडसपूर्ण कारवाई करत एका तरुणाला देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह जेरबंद केले. जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांची एकूण किंमत अंदाजे ४० हजार रुपये आहे.
यावल पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासादरम्यान चौकशीत एक आरोपीने शिवाजी नगरातील अक्षय अजय जयस्वाल (वय २४) याला पिस्तूल विकल्याचे उघड केले. या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल यांच्या पथकाने जयस्वालचा शोध सुरू केला.
आंबेडकर मार्केट परिसरात तो संशयास्पदरीत्या मोटारसायकलवर (क्र. MH 19 BK 8893) बसलेला आढळला. चौकशीत त्याने पिस्तूल मोटारसायकलच्या सीटखाली लपवून ठेवल्याचे सांगितले. झडतीत पोलिसांना मॅगझीनसह लोखंडी देशी पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे हस्तगत झाली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक शरद बागल, हेड कॉन्स्टेबल अक्रम शेख धनगर, प्रवीण भालेराव, नितीन बाविस्कर, पोलीस नाईक किशोर सोनवणे आणि कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर, गोपाल पाटील यांनी केली.





