
भीषण अपघातात सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू ; जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुलीवरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील इच्छादेवी चौकात मंगळवारी (दि.१६) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
या घटनेत वसंत प्रताप पाटील (वय ७०, रा. खंडेराव नगर) यांचा मृत्यू झाला. ते सकाळी सायकलने आपल्या घरी परतत असताना इच्छादेवी चौकात समोरून चुकीच्या मार्गाने वेगात येणाऱ्या ओमनी कारने जोरदार धडक दिली. धडकेमुळे ते रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ मदत करून त्यांना खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. हनिफा मोमीन यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे





