जळगावमध्ये सोने-चांदी दरात विक्रमी वाढ; सोन्याने पार केला एक लाखाचा टप्पा, चांदीनेही गाठला उच्चांक

जळगावमध्ये सोने-चांदी दरात विक्रमी वाढ; सोन्याने पार केला एक लाखाचा टप्पा, चांदीनेही गाठला उच्चांक
जळगाव (प्रतिनिधी) : सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून, जळगावच्या सुवर्ण बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल ११३३ रुपयांची आणि चांदीत २०६० रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे विनाजीएसटी सोन्याचा दर १,००,५३३ रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीने १,२०,५१० रुपये प्रति किलो हा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या दरवाढीने ग्राहकांच्या चिंतेत भर पडली असून, सराफ व्यावसायिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, मंगळवारी जीएसटीसह चांदीचा दर १,१८,४५० रुपये प्रति किलो होता. अवघ्या पाच दिवसांत चांदीच्या दरात ४०९० रुपयांची वाढ झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, सध्या जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चितता, परदेशी बाजारातील वाढती मागणी, अमेरिकन डॉलरचे घसरणारे मूल्य आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल – या सर्व कारणांमुळे मौल्यवान धातूंच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. भारतात आगामी सण-उत्सव, लग्नसराई यामुळेही स्थानिक बाजारात सोन्या-चांदीची मागणी वाढणार आहे, असा अंदाज असून यामुळे किमती आणखी वाढू शकतात.
गेल्या काही आठवड्यांत दर स्थिर असल्याने ग्राहक खरेदीसाठी फिरकताना दिसत होते. मात्र, पुन्हा एकदा सुरू झालेल्या दरवाढीमुळे खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोन्याच्या दराने विनाजीएसटी एक लाखाचा टप्पा ओलांडल्याने सर्वसामान्यांसाठी दागदागिन्यांची खरेदी अधिक कठीण झाली आहे. दरवाढीचा हा कल पुढेही कायम राहिल्यास, ग्राहकांना लग्नसराईत मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
