दारू न मिळाल्याने हॉटेलवर हल्ला; मॅनेजरला शिवीगाळ, तोडफोड आणि रोकड लुटली

दारू न मिळाल्याने टोळक्याचा धुडगूस !
मॅनेजरला बेदम मारहाण करून हॉटेलची तोडफोड करीत लांबवली रोकड !
भुसावळ: साकेगाव (ता. भुसावळ) येथील वरुण हॉटेलमध्ये दारूची बाटली न दिल्याच्या रागातून टोळक्याने मॅनेजरला शिवीगाळ, हॉटेलची तोडफोड आणि गल्ल्यातील रोकड लुटल्याची घटना २३ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी २४ जून रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.हॉटेलचे मॅनेजर सुमित इंगळे (वय ३३, रा. भुसावळ) यांनी दारू न दिल्याने संतप्त झालेले कुणाल अहिरे, सोनू मस्के, नवीन लोखंडे, अमोल भुसारी आणि त्यांच्यासोबत ८ ते १० अनोळखी व्यक्तींनी हॉटेलवर हल्ला केला. या टोळक्याने सुमित यांना शिवीगाळ करत धमकी दिली, हॉटेलमधील वस्तूंची तोडफोड केली आणि गल्ल्यातील २० ते २५ हजार रुपये लुटले.याशिवाय, आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर मशीनही चोरली. सुमित इंगळे यांच्या तक्रारीवरून वरील चौघांसह ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.





