
राजकीय भूकंप ; दोन माजी महापौरांसह ‘या’दिग्गजांचा होणार भाजपात प्रवेश !
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार ; कुणाचा होतो प्रवेश याकडे लागले लक्ष
जकी अहमद I खान्देश टाइम्स न्यूज
जळगाव जिल्ह्यातील राजकारणाला नव्या वळणावर नेणारा मोठा राजकीय भूकंप आज दुपारी होणार असून शहरातील दोन माजी महापौर आणि दिग्गज माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जि.एम. फाऊंडेशन भाजप कार्यालयात दुपारी चार वाजता होणाऱ्या या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागून असून कोणत्या राजकीय पक्षावर आपत्ती येते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह अनेक माजी नगरसेवक गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याच्या चर्चा जळगाव शहराच्या राजकीय वर्तुळात होत्या. विविध कारणांमुळे पक्ष प्रवेश सोहळा लांबला असल्याने मात्र आज हा योग्य जुळून आला आहे. यामुळे जळगावच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार असून आगामी महापालिका निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष बाजी मारतो याकडेही जळगावकरांचे लक्ष लागून आहे . तसेच या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.
दरम्यान, या प्रवेश सोहळ्यात नितीन लढ्ढा यांच्यासह माजी महापौर जयश्री महाजन, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, आण्णा भापसे, इकबाल पिरजादे, पिंटू सपकाळे, हर्षा अमोल सांगोरे, जाकीर पठाण, फिरोज पठाण आदी माजी नगरसेवक प्रवेश घेणार असल्याचे समोर आले आहे.





