
जळगाव पोलीस दल अधिक सज्ज : सर्व पोलीस ठाण्यांना ‘आपत्ती प्रतिसाद किट’चे वाटप
जिल्हा प्रशासन व पोलीस दलाची संयुक्त पुढाकार; Disaster Response Kitसह तांत्रिक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
जळगाव (प्रतिनिधी) : नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल अधिक सज्ज होत असून, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ‘आपत्ती प्रतिसाद किट’चे वाटप करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जळगाव जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, २० एप्रिल रोजी पोलीस मुख्यालयातील पन्द्मालय हॉल येथे ‘Disaster Response Kit’ संदर्भात प्रशिक्षण व वितरण कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना किटचे वितरण करण्यात आले. यावेळी किटमधील साहित्याचा आपत्ती काळात प्रभावी वापर कसा करावा याबाबत संबंधित पुरवठादार संस्थेच्या प्रशिक्षकांकडून सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपत्तीच्या प्रसंगी स्थानिक पातळीवर तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आणि बचावकार्य अधिक गतिमान व परिणामकारक करण्यासाठी या अद्ययावत किटचा मोठा उपयोग होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपत्ती व्यवस्थापनात पोलीस दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले, तर पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी वितरित साहित्याची योग्य देखभाल करून ते नेहमी कार्यक्षम स्थितीत ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती सज्जता मोहिमेचा हा महत्त्वपूर्ण भाग मानला जात असून, या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रभावी होण्यास मदत होणार आहे.




