आरसीपी–क्यूआरटीचा आढावा; आपत्कालीन प्रतिसाद अधिक सक्षम करण्यावर भर

आरसीपी–क्यूआरटीचा आढावा; आपत्कालीन प्रतिसाद अधिक सक्षम करण्यावर भर
जळगाव पोलिसांकडून विशेष पथकांच्या कार्यपद्धती, अडचणींची सखोल समीक्षा
जळगाव : जिल्हा पोलिस दलात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत ठेवण्यासाठी आज सकाळी RCP (Riot Control Police) आणि QRT (Quick Response Team) या विशेष पथकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत पथकांच्या अडीअडचणी, कार्यपद्धती, शिस्त (कंडक्ट) तसेच प्रतिसादक्षमता यावर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यात सध्या १५ आरसीपी पथके आणि २ क्यूआरटी हिट टीम्स कार्यरत असून, आपत्कालीन परिस्थितीत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
आरसीपीचे (दंगल नियंत्रण पथक) प्रमुख कार्य
आरसीपी पथक हे मोठ्या जमावाचे नियंत्रण आणि दंगल परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित असते.
राजकीय सभा, मोर्चे, उत्सव यावेळी जमाव नियंत्रण ठेवणे, तसेच जातीय तणाव किंवा हिंसाचार उसळल्यास परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणणे हे या पथकाचे मुख्य काम आहे.
क्यूआरटीचे (जलद प्रतिसाद पथक) कार्य
क्यूआरटी हे अत्यंत प्रशिक्षित व जलद हालचाल करणारे पथक असून, उच्च जोखीम असलेल्या घटनांमध्ये ‘फर्स्ट रिस्पॉन्डर’ म्हणून कार्य करते.
दहशतवादविरोधी कारवाया, ओलीस सुटका, तसेच गंभीर गुन्हे किंवा आपत्कालीन घटनांमध्ये काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून कारवाई करणे ही या पथकाची खासियत आहे.
या पथकातील जवानांना अत्याधुनिक शस्त्रास्त्र हाताळणी, विना शस्त्र लढा (Unarmed Combat) आणि कठीण परिस्थितीत काम करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. मोठ्या ऑपरेशनमध्ये ते ATS आणि NSG सारख्या दलांना देखील मदत करतात.
प्रतिसाद क्षमता वाढविण्यावर भर
बैठकीदरम्यान पथकांची कार्यक्षमता अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक सुधारणा, प्रशिक्षण आणि समन्वय यावर भर देण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना जलद आणि सुरक्षित मदत मिळावी, हा या आढाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यामुळे जळगाव जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा आणखी सक्षम होऊन कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होणार असल्याचे चित्र दिसत आहे.





