महाराष्ट्रात पावसाचा कहर; ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पालघरमधील शाळांना सुट्टी

महाराष्ट्रात पावसाचा कहर; ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पालघरमधील शाळांना सुट्टी
मुंबई वृत्तसंस्था l महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने ७ जुलै २०२५ रोजी राज्यातील ९ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मेघगर्जनेसह वीजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचा जोर वाढल्याने काही भागांमध्ये नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून डोंगराळ भाग आणि घाटमाथ्यांमध्ये दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा हा जोर १० जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पालघर जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ७ जुलै रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये सरकारी, खासगी, जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित तसेच आश्रमशाळा आणि अंगणवाड्यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली असून पालकांनी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दरम्यान, हवामान खात्याने कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणातील किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे तर घाटमाथ्यांवर अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. विदर्भात मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मराठवाड्यातील काही भागांतही विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.
नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पाण्याने भरलेल्या ठिकाणी जाऊ नये आणि सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचना वेळोवेळी ऐकून योग्य ती काळजी घ्यावी. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून, आवश्यकतेनुसार तत्काळ मदत दिली जाणार आहे. शाळा बंद असल्या तरी पालकांनी मुलांना घरातच ठेवावे आणि हवामान खात्याच्या व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.