इतर

वडापाव विक्रेत्यावर हल्ला; चांदीची चैन हिसकावली, तिघांविरोधात गुन्हा

वडापाव विक्रेत्यावर हल्ला; चांदीची चैन हिसकावली, तिघांविरोधात गुन्हा
अमळनेर : शहरातील भावसार चौक परिसरात वडापाव विक्रेत्यावर तिघांनी हल्ला करून त्याच्या गळ्यातील चांदीची चैन हिसकावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश प्रवीण पवार (वय २६, रा. कलागुरू मंगल कार्यालयामागे, धुळे रोड, अमळनेर) हे भावसार चौक परिसरात वडापावची गाडी लावतात. दि. ६ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गौरव कैलास सोनार, हर्षल बागुल उर्फ बंटी शिंपी आणि दीपेश महाजन उर्फ बंटी महाजन हे तिघे मोटारसायकलवरून तेथे आले.

त्यावेळी फिर्यादी गणेश पवार हे मोबाईलवर व्हिडिओ तयार करत होते. याचा राग आल्याने आरोपींनी “व्हिडिओ का काढतो?” अशी विचारणा करत त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने विरोध केल्याने आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच “अमळनेरचे बाप आम्हीच आहोत” अशी धमकी देत त्यांच्यावर दहशत निर्माण केली.
मारहाण करत असतानाच आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे ३ भार वजनाची चांदीची चैन तोडून पळ काढला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 119(1), 351(2), 352 आणि 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button