
मोठी बातमी : जळगावात बांगलादेशी महिलेची घुसखोरी उघड; आश्रयदात्यासह दोघांना बेड्या
शनिपेठ पोलिसांची मोठी कारवाई
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात अवैध परदेशी नागरिकांविरोधात पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेल्या ‘विशेष शोध मोहिमे’ला मोठे यश आले आहे. शहरात कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय घुसखोरी करून राहणाऱ्या एका २० वर्षीय बांगलादेशी महिलेला शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत महिलेसह तिला आश्रय देणाऱ्या एका व्यक्तीवरही गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीवरून जोशी पेठेत छापा
शहरातील जोशी पेठ भागातील भोई गल्लीत एक परदेशी महिला बनावट कागदपत्रांच्या आधारे किंवा अवैध मार्गाने राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने १० मे २०२६ रोजी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी कोणीका राणी शामलचंद्र राय (वय २०, रा. बांगलादेश) ही महिला कोणतीही वैध कागदपत्रे (पासपोर्ट किंवा व्हिसा) सादर करू शकली नाही.
अवैध वास्तव्य आणि आश्रय
तपासादरम्यान असे समोर आले की, सदर महिलेने भारतीय सरहद्दीतून अवैध मार्गाने घुसखोरी केली होती. तिला चिन्मय जगन्नाथ वाला (रा. जळगाव, मूळ रा. पश्चिम बंगाल) याने आश्रय दिला होता. संबंधित महिला ही बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती असतानाही, चिन्मयने ही बाब पोलिसांपासून लपवून ठेवून तिला राहण्यास जागा दिली. या गुन्ह्यात सहभागी असल्यामुळे पोलिसांनी चिन्मयलाही आरोपी केले आहे.
पोलिसांची कडक कारवाई
याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात ‘इमिग्रेशन आणि परदेशी कायदा २०२५’ च्या विविध कलमान्वये (कलम २१, ०८, २४) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी हे करत आहेत.
नागरिकांना आवाहन:
“राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आणि अवैध वास्तव्य रोखण्यासाठी जळगाव पोलीस दल सतर्क आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात राहणाऱ्या कोणत्याही संशयास्पद व्यक्तीबद्दल किंवा अवैध वास्तव्याबद्दल तातडीने पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे.”
— श्रीकांत धीवरे, पोलीस अधीक्षक जळगाव.





