
१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील धक्कादायक घटना
पाचोरा (प्रतिनिधी): पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे १८ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाजिया शमशोद्दीन पिंजारी (वय १८) असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाजियाने राहत्या घरातील मागील खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नाजियाने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





