खान्देशजळगांव

ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले

महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

जळगाव : शहरातील वाढते तापमान नियंत्रणात आणण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी जळगाव महानगरपालिका व ‘ग्रीन सिटी फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महापौर दीपमाला काळे आणि मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जळगाव शहर अधिक हरित, पर्यावरणपूरक आणि तापमानाच्या दृष्टीने संतुलित करण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पाच वर्षांत तापमान घटविण्याचे उद्दिष्ट

‘ग्रीन सिटी फाउंडेशन’ने सन २०२६ ते २०३० या कालावधीत जळगाव शहराचे तापमान कमी करण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित केले आहे. या उपक्रमाला महानगरपालिकेचे संपूर्ण सहकार्य लाभणार असून, शहरातील विविध भागांसह शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

वृक्षारोपणासह संवर्धनावर भर

बैठकीत वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन यालाही तितकेच महत्त्व देण्यावर भर देण्यात आला. केवळ झाडे लावणे नव्हे, तर ती जगविणे आणि वाढविणे हीच या उपक्रमाची खरी यशस्वीता असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

नागरिकांच्या सहभागाचे आवाहन

जळगाव शहर अधिक हिरवेगार आणि थंड ठेवण्यासाठी नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही सांगण्यात आले.

बैठकीला उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक आयुक्त संजय राऊत, पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील तसेच ‘ग्रीन सिटी फाउंडेशन’चे विजयकुमार वाणी, डॉ. धनंजय बेंद्रे यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

महापौरांचे प्रतिपादन

“वृक्षारोपणाचे काम हे केवळ नावापुरते न राहता संवर्धनाच्या दृष्टीने झाले पाहिजे. यासाठी आपण व्यवस्थित नियोजन करत आहोत. पुढील चार महिन्यांत शहरात अतिशय चांगल्या पद्धतीने वृक्षारोपण केले जाईल, जेणेकरून भविष्यात जळगावचे तापमान कमी होण्यास मोठी मदत होईल.”

— दीपमाला काळे, महापौर, जळगाव महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button