पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नियुक्ती आदेश, धनादेश व गटई स्टॉलचे वितरण

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नियुक्ती आदेश, धनादेश व गटई स्टॉलचे वितरण
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना नियुक्ती आदेश, धनादेश आणि स्वयंरोजगारासाठी गटई स्टॉलचे वितरण करण्यात आले.
शाहू महाराजांना अभिवादन
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रास्ताविकातून समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यानंतर शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.
लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ
कार्यक्रमात अॅट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत विश्वास अर्जुन घोडे (धुळे) आणि रवि अशोक दांडगे (छत्रपती संभाजीनगर) यांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
तसेच दिवंगत ऊसतोड कामगार धुडकू कथा अहिरे यांच्या वारस कथा अर्जुन अहिरे यांना ५ लाख रुपयांच्या आर्थिक सहाय्याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
याशिवाय स्वयंरोजगारासाठी १० लाभार्थ्यांना गटई स्टॉलचे वाटप, तर शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार अंतर्गत पाच गुणवंत विद्यार्थ्यांना धनादेश देऊन गौरविण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
शासन वंचितांच्या पाठीशी
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. सामाजिक न्यायाची संकल्पना केवळ धोरणापुरती मर्यादित न राहता ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे यांनी केले.





