
चोपड्यात अवैध शस्त्र तस्करीचा पर्दाफाश; तिघांच्या मुसक्या आवळल्या
एलसीबी व शहर पोलिसांची संयुक्त कारवाई; गावठी कट्टा, कारसह सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि चोपडा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची वाहतूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि एक चारचाकी वाहन असा सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेला १ जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही संशयित विनापरवाना गावठी कट्टा घेऊन Hyundai EON कारमधून लासूर–चुंचाळे मार्गे चोपड्याकडे येत असल्याची माहिती मिळाली होती.
माहितीची खातरजमा केल्यानंतर एलसीबी आणि चोपडा शहर पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. पथकाने चोपडा–लासूर–चुंचाळे मार्गावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास संशयित Hyundai EON (एमएच-२० ईई-६१०३) कार अडवून पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान कारच्या मागील सीटखाली मॅगझिनसह एक गावठी कट्टा आणि एक अतिरिक्त मॅगझिन आढळून आले. आरोपींच्या अंगझडतीत तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.
या प्रकरणात ज्ञानेश्वर रामकृष्ण माळी (रा. कुन्हाड खुर्द, ता. पाचोरा), सचिन रोशन पवार (रा. मयूर पार्क कॉलनी, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि अनिल कचरे साळुंखे (रा. जाधव गल्ली, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात सुमारे ६० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व मॅगझिन, १० हजार रुपये किमतीचे अतिरिक्त मॅगझिन, पाच लाख रुपये किमतीची Hyundai EON कार तसेच सुमारे ३० हजार रुपये किमतीचे Oppo, Vivo आणि Redmi कंपनीचे तीन मोबाईल फोन यांचा समावेश आहे.
या शस्त्रास्त्रांची वाहतूक नेमकी कोणासाठी केली जात होती, तसेच या टोळीचे इतर गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध आहेत का, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, दीपक माळी, रविंद्र पाटील, विष्णू बिन्हाडे, रावसाहेब पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, युवराज बाकुंज आणि इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.





