जळगावात ३.५८ लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; एकास अटक, मालेगाव कनेक्शन उघड!

जळगाव l प्रतिनिधी l जळगाव जिल्हा पोलीस दलाने अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पुन्हा एकदा मोठी कारवाई करत ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि एम.आय.डी.सी. पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एम.आय.डी.सी. हद्दीतून ६२.०७ ग्रॅम ‘एमडी’ (Mephedrone) हा घातक अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
गोडाऊन परिसरात गस्तीदरम्यान सापळा :
दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी रात्री १०:४० वाजेच्या सुमारास, एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ (FCI गोडाऊन), सेक्टर क्र. A-14 च्या समोरील रस्त्यावर पोलीस पथक गस्त घालत होते. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात घातक ‘एमडी’ ड्रग्ज आढळून आल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.
अटक आरोपी व मालेगाव कनेक्शन :
अटक केलेला आरोपी: इम्रान खान हयात खान (वय ३६, मूळ रा. आडगाव, ता. जळगाव; सध्या रा. करीम नगर, फातिमा नगर, एम.आय.डी.सी., जळगाव).
तपासात निष्पन्न मुख्य पुरवठादार: रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक)
पोलीस तपासात जप्त केलेला ‘एमडी’ साठा मालेगाव येथील रफीक उर्फ गोल्डन याने विक्रीसाठी पुरवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹३,५८,०००)
तपशील | प्रमाण / वर्णन | अंदाजे किंमत
१) एमडी (Mephedrone) – ३९.०६ ग्रॅम – ₹ १,९६,०००
२) प्लास्टिक पिशव्यांतील एमडी – ९.१० ग्रॅम (११ पिशव्या) – ₹ ३६,०००
३) प्लास्टिक पिशव्यांतील एमडी – १३.९१ ग्रॅम (१८ पिशव्या) – ₹ ५६,०००
एकूण ड्रग – ६२.०७ ग्रॅम – ₹ २,८८,०००
४) मोबाईल फोन – रियलमी कंपनी – ₹ २०,०००
५) दुचाकी – हिरो होंडा स्प्लेंडर – ₹ ५०,०००
कडक कलमांन्वये गुन्हा दाखल :
या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ६३५/२०२६ अन्वये अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act, 1985) कलम ८(क), २२(क), २९ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार अतुल रघुनाथ वंजारी यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करत आहेत.
पोलीस प्रशासनाचे आवाहन :
अमली पदार्थांची तस्करी किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी अजिबात न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा. समाजाच्या सुरक्षेसाठी पोलीस व नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.





