
सुप्रीम कॉलनीत किराणा दुकानासमोर वाळू टाकण्यावरून दोन गटांत दगडफेक; एमआयडीसी पोलिसांचा बंदोबस्त
जळगाव: जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात एका किराणा दुकानासमोर वाळू टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून गुरुवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन दगडफेक झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून एमआयडीसी पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे (SDPO) आरसीपी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले अन् त्यांनी जमावाला पांगवून परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुकानासमोर वाळू टाकण्यावरून दुकानदाराच्या मुलाचा एका व्यक्तीशी वाद झाला. या वादानंतर काही तरुणांनी एकत्र येत समोरील गल्लीत दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटाकडूनही दगडफेक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीची सखोल पडताळणी करत असून, यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुप्रीम कॉलनीतील परिस्थिती सध्या पूर्णपणे सामान्य आणि शांततापूर्ण आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नयेत, तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे अधिकृत आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





