

चाळीसगावात घरातून १८ किलो ६८६ ग्रॅम गांजा जप्त; एकाला अटक
९ लाख ३४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
चाळीसगाव | प्रतिनिधी : चाळीसगाव शहर पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करत एका संशयिताकडून तब्बल १८ किलो ६८६ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत ९ लाख ३४ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला असून, भुषण केशव पवार (वय ४५, रा. चांमुडा माता मंदिराजवळ, डोंगरी नदीच्या बाजूला, चाळीसगाव) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी रात्री १०.१० वाजेच्या सुमारास चांमुडा माता मंदिराजवळ डोंगरी नदीच्या बाजूला असलेल्या आरोपीच्या राहत्या घरात ही कारवाई करण्यात आली. आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने घरात गांजा साठवून ठेवल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
दोन पिशव्यांमध्ये गांजा
पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका प्लास्टिकच्या पिशवीत ५ किलो ४०१ ग्रॅम गांजा आढळून आला. त्याची किंमत २ लाख ७० हजार ५०० रुपये आहे. तसेच एका पांढऱ्या गोणीमध्ये १३ किलो २८५ ग्रॅम गांजा आढळला असून त्याची किंमत ६ लाख ६४ हजार २५० रुपये आहे. दोन्ही मिळून १८ किलो ६८६ ग्रॅम गांजा आणि एकूण ९ लाख ३४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०२/२०२६ अन्वये एनडीपीएस अधिनियम १९८५ चे कलम ८(सी), २०(बी)(ii)(B) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई दिलीप शिवाजी राक्षे यांनी फिर्याद दिली असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर जंजाळे यांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले पुढील तपास करीत आहेत.
अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या प्रकरणातील गांजाचा स्रोत व त्याच्या विक्रीसाठी कोणाचा सहभाग होता का, याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे.




