

आई-बापाला समजून घ्या! वडिलांना मिठी मारताच लेकींच्या अश्रूंना वाट
‘न समजलेले आई-बाप’ व्याख्यानातून प्रा. वसंत हंकारेंनी जागवली पालकांच्या त्यागाची जाणीव; मोबाइलच्या गुलामीतून बाहेर पडण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
जळगाव, प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या जीवनात मोबाइल, व्यसनाधीनता आणि क्षणभंगुर सुखांच्या मागे धावताना आई-वडिलांशी असलेला संवाद आणि जिव्हाळा कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत आई-वडिलांचे महत्त्व, त्यांचा त्याग आणि मुलांची त्यांच्याप्रती असलेली जबाबदारी याची जाणीव करून देणारा ‘न समजलेले आई-बाप’ हा भावनिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम जळगावात अत्यंत हृदयस्पर्शी वातावरणात पार पडला.
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे रविवार, ६ सप्टेंबर रोजी मु. जे. महाविद्यालयातील कवी कालिदास सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी आपल्या भावनिक आणि प्रभावी संवादातून उपस्थित मुला-मुलींना आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव करून दिली.
वडिलांना मिठी मारताच सभागृह भावूक
प्रा. हंकारे यांनी व्याख्यानादरम्यान उपस्थित वडिलांना व्यासपीठावर बोलावून मुलींना आपल्या वडिलांजवळ जाण्याचे आवाहन केले. ‘वडिलांना समजून घ्या, त्यांच्या जवळ जा आणि एकदा त्यांना मिठी मारून पहा,’ असे आवाहन करताच अनेक मुलींच्या भावनांचा बांध फुटला.
मुलींनी आपल्या वडिलांना मिठी मारताच सभागृहातील वातावरण भावूक झाले. अनेक मुलींच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर वडिलांनीही आपल्या लेकींना जवळ घेत भावनांना वाट करून दिली. या हृदयस्पर्शी प्रसंगामुळे काही काळ संपूर्ण सभागृहात शांतता पसरली.
‘जिवंतपणी आई-बापाची कदर करा’
प्रा. हंकारे यांनी सांगितले की, आई-वडील जिवंत असताना त्यांची कदर करा आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणू नका. ते गेल्यानंतर त्यांच्या फोटोला हार घालण्यात अर्थ नाही. आईने नऊ महिने वेदना सहन करून मुलाला जन्म दिला, तर वडील आयुष्यभर कष्ट करून कुटुंबाचा आधार बनतात. त्यामुळे त्यांच्या त्यागाची जाणीव मुलांनी कायम ठेवली पाहिजे.
तरुण पिढीने मोबाइल आणि क्षणिक सुखांच्या मोहातून बाहेर पडून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, माता रमाई, राजमाता जिजाऊ आणि अहिल्यादेवी होळकर यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘मोबाइलच्या गुलामीतून बाहेर पडा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी युवा पिढीने मोबाइलच्या आहारी जाण्याऐवजी कुटुंबासाठी वेळ द्यावा, असे आवाहन केले. मुलांनी आई-वडिलांशी संवाद वाढवून कुटुंबव्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
‘पालक आणि मुलांमधील संवाद हरवत चालला’ – आ. सुरेश भोळे
आमदार सुरेश भोळे यांनी आजच्या धावपळीच्या युगात आई-वडील आणि मुलांमधील संवाद हरवत चालल्याची खंत व्यक्त केली. हा संवाद पुन्हा जिवंत करण्याची गरज असून, कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
कृतीतून उमटला ‘आई-बापाला समजून घ्या’चा संदेश
कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘आई-बापाला समजून घ्या’ हा संदेश मुलांच्या मनावर ठसवण्यात आला. केवळ भाषणापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून आई-वडिलांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा अनुभव मुलांना या कार्यक्रमातून मिळाला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने, आकाश भंगाळे, विनय चांडक, जैन उद्योग समूहाचे मीडिया प्रमुख अनिल जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी फाउंडेशनचे प्रभारी अध्यक्ष सचिन पाटील आणि सचिव अभिजीत पाटील यांचीही व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमीत देशमुख यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी, पत्रकार, छायाचित्रकार, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमीत देशमुख यांनी केले, तर प्रास्ताविक अभिजीत पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे सदस्य हेमंत पाटील, प्रकाश लिंगायत, अरुण इंगळे, भूषण पाटील, पांडुरंग महाले, भूषण हंसकर आणि रुपेश महाजन यांनी परिश्रम घेतले.




