खान्देशगुन्हेजळगांव

हॉटेलमधील खोलीत वृद्धाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; जळगाव शहरात खळबळ

हॉटेलमधील खोलीत वृद्धाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; जळगाव शहरात खळबळ

जळगाव | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यातील ७० वर्षीय व्यवसायिक जळगावमध्ये आल्यावर अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शहरातील एका हॉटेलमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (२ मे) सकाळी उघडकीस आली.

मयताचे नाव मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन (वय ७०, रा. आंबेगाव, मंचर, जि. पुणे) असे असून, ते रबरी शिक्के बनवण्याचा व्यवसाय करीत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ते २८ एप्रिल रोजी कामानिमित्त जळगाव जिल्हा न्यायालयात आले होते. शिक्क्यांचे काम पूर्ण केल्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी नवीन बसस्थानकाशेजवळील एका हॉटेलच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, संबंधित खोलीत मोहम्मद शफी यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्यांच्या मुलाने हंबरडा फोडला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button