जळगाव, दि.१४ – चाळीसगाव शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करीत खून करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. मयत तरुण हा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याचे समजते. दरम्यान, चाळीसगाव पोलिसांनी याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले असून क्रिकेट स्पर्धेच्या वादातून खून झाल्याची माहिती समोर आली आहे.
चाळीसगाव पीर मुसा कादरी बाबा दर्गा जवळ पाटणादेवी नाक्याजवळ रविवारी सायंकाळी पाच वर्षाच्या सुमारास शुभम आगोणे या तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. घटनेत शुभम गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मयत शुभम हा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली असून क्रिकेट स्पर्धेत झालेल्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतल्याचे कळते.