खान्देश टाइम्स न्यूज | ६ जुलै २०२३ | समाजात सध्या सर्वत्र मुलांना विवाहासाठी मुलगी भेटत नसल्याने प्रेम प्रकरणांचा मामला लवकरात लवकर आटोपत लग्नाचा कार्यक्रम लगबगीने करण्याचे प्रमाण वाढले आहे. जळगावातील एका तरुणाला नुकतेच अशी घाई अंगाशी आली आहे. १५ दिवसापूर्वी जुळलेले प्रेम लागलीच लग्नात बदलले आणि तीचे बिंग फुटले आहे. आपली पत्नी स्त्री नसून तृतीयपंथी असल्याचे उघड झाल्यानंतर तरुणाच्या पायाखालील जमीनच सरकली.
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र (वय २७, नाव बदलेले) या तरुणाची १४ एप्रिल २०२३ रोजी फेसबुकवर दिव्या उर्फ रोहित मनीष मशीह या तरुणीशी ओळख झाली होती. काही दिवसात दोघांनी एकमेकांशी केलेल्या चॅटिंगचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर लागलीच १५ दिवसांनी म्हणजेच २९ एप्रिल रोजी दोघांनी विधीवत लग्न केले. दिव्याचे आई – वडील वारले असल्याने कमी नातेवाईकांमध्ये विवाह करण्याचे त्यांनी ठरवले.
लग्नानंतर काही दिवसांत आपली पत्नी ही नववधू सारखी वागत नव्हती. त्याला स्पर्श देखील करू देत नव्हती. त्यामुळे महेंद्रने ही बाब आपल्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर कुटुंबियांनाही दिव्याला डॉक्टरांकडे नेत वैद्यकीय चाचणी केली. यात दिव्या ही स्त्री नसून तिला गर्भधारणा होऊ शकत नाही, असा रिपोर्ट डॉक्टरांनी दिला. यामुळे कुटुंबियांना धक्काच बसला. त्यांनी याबाबत दिव्याला विचारणा केल्यावर तिने संजयच्या कुटुंबियांकडे तब्बल १० लाखांची मागणी केली.
आपली फसवणूक झाल्यावर खंडणी मागितली जात असल्याने महेंद्र याने न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले. त्यानुसार न्यायाधिश आर. वाय. खंडारे यांच्या न्यायालयात सुनावणीअंती न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. यात दिव्या उर्फ रोहित मनिष मशीह याच्याविरुद्ध खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने रामानंदनगर पोलिसांना दिले आहेत. महेंद्रतर्फे ॲड.केदार भुसारी यांनी काम पाहिले. दरम्यान, दिव्या उर्फ रोहित याने चार जणांना अशाच प्रकारे लुबाडले असल्याचे अँड.भुसारी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.