चाळीसगाव :- रिक्षात राहिलेली 60 हजार रुपये किंमतीची 11 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असलेली हरवलेली बॅग अवघ्या एका तासाच्या आत चाळीसगाव शहर पोलिसांनी शोधून ती परत केली आहे. या कामगिरीबद्दल चाळीसगाव शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुदाम सोपानराम माकोडे (रांजणगाव, एमआयडीसी, जि. छत्रपती संभाजीनगर) हे त्यांचे पत्नीसह मनमाड येथून रेल्वेने गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथे आले. त्यांना कनाशी ता. भडगाव येथे जावयाचे असल्याने ते चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून रिक्षात बसून बस स्टॅण्ड येथे उतरले. त्यांच्याकडील लाल रंगाच्या बॅगेत सुमारे 60 हजार रुपये किंमतीची 11 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत रिक्षात विसरून गेल्याने त्यांनी त्या रिक्षाचा शोध घेतला असता ती सापडली नाही, ते चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आले होते. नंतर सुदाम माकोडे यांना पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी विचारपूस करून लागलीच ही बॅग व रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिस अंमलदारांचे पथक रवाना केले. या पथकाने रिक्षाचालकाला शोधून काढले. त्याची रीक्षा तपासली असता त्याच्यात सुदाम माकोडे यांची लाल रंगाची बॅग सापडली.
पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास आव्हाड, राहुल सोनवणे, योगेश बेलदार, महेंद्र पाटील, भूषण पाटील, रवींद्र बच्छे, समाधान पाटील, विजय पाटील, राकेश महाजन, आशुतोष सोनवणे, पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, ज्ञानेश्वर गीते यांनी केली.