
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यासह शहरात तापमान सतत वाढत असून उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानाने ४० अंशांच्या आसपास मजल मारली आहे. या वाढत्या तापमानासोबतच विजेची मागणी सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढत असून महावितरणकडून संभाव्य लोडशेडिंगचे संकेत देण्यात आले आहेत.
दरम्यान, शहरातील अनेक भागांत विजेच्या वापराबाबत दक्षता घेणे अपेक्षित असताना, महापालिकेकडून मात्र बेजबाबदारपणे वीज वापरली जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शहरातील शिवाजीनगर येथील उस्मानिया पार्क परिसरात भरदुपारी १ वाजता पथदिवे सुरू असल्याचे दिसून आले. सूर्य प्रखर असतानाही सुरू असलेले हे पथदिवे विजेच्या अनावश्यक नासाडीचे उत्तम उदाहरण आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते युसूफ शाह यांनी लक्ष वेधले असून, त्यांनी याबाबत संबंधित महापालिका अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “एकीकडे नागरिक लोडशेडिंग आणि विजेच्या खंडित पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत, तर दुसरीकडे भरदुपारी पथदिवे सुरू ठेवून वीज वाया घालवली जात आहे. ही गंभीर आणि बेजबाबदार वृत्ती आहे,” असे शाह यांनी म्हटले आहे.
या प्रकारामुळे नागरी वर्तुळात संतापाची भावना असून, महापालिकेच्या निष्काळजीपणावर सवाल उपस्थित होत आहेत. यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी आणि सार्वजनिक वीजेचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.