गुन्हेजळगांवशासकीय

खान्देश टाइम्स इम्पॅक्ट : तायडेंचा पदभार काढला, ‘सेठ’ पुन्हा शोधणार नवीन जोडीदार?

खान्देश टाइम्स न्यूज | ७ फेब्रुवारी २०२४ | जळगाव शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागातील गलथान कारभाराची मालिका खान्देश टाइम्स न्यूजने प्रसिद्ध केली होती. नेहमी आर्थिक देवाण घेवाणचे आरोप होत असलेल्या नगररचना विभागात ‘सेठ’चा हस्तक्षेप असल्याचे खान्देश टाइम्स न्यूजने समोर आणल्यानंतर मनपा आयुक्तांनी देखील त्याकडे लक्ष वेधले. मनपात आणि नगररचना विभागाच्या कामात बिनधास्त हस्तक्षेप असलेल्या ‘सेठ’ला आवर घालण्यात मनपा आयुक्त कधी यशस्वी होणार हे नक्की नसले तरी दिघेश तायडे यांच्याकडील सहायक संचालक, नगररचना विभाग यांच्याकडील बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र व इतर दाखल्यांचे अधिकार त्यांनी रद्द केले आहेत.

जळगाव शहर मनपातील नगररचना विभाग आणि त्याठिकाणी सध्या काही निवडक लोकप्रतिनिधी आणि एका सेठचा हस्तक्षेप वाढला होता. जळगावात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या नियमबाह्य आणि अनधिकृत बांधकामाची संबंधित फायली इकडून तिकडे फिरविण्याचे आणि आर्थिक देवाण घेवाणचे काम सेठच्या माध्यमातून होत असल्याची चर्चा खान्देश टाइम्स न्यूजने प्रसिद्ध केली होती. तसेच जळगावातील दै.लोकमतने देखील सेठबाबत वृत्त प्रकाशित केले होते.

मनपात केवळ सेठच नाही तर काही इतर व्यक्ती देखील शासकीय फाईल इकडून तिकडे घेऊन जाताना दिसतात. नगररचना विभागातील कामे बाहेरच्या बाहेर पूर्ण करून देण्यासाठी सध्या २-३ पंटरमध्ये चढाओढ सुरू असून त्यातूनच खरी स्पर्धा वाढत आहेत. खाजगी पंटरच्या माध्यमातून कामे जलद गतीने आणि कोणत्याही नियमशीर चौकशी पार न पडता मार्गी लागत असल्याने पंटर लोकांची चलती आहे. वाढत्या स्पर्धेतून पंटर एकमेकांवर शिंतोडे उडवू लागले असून त्यात मनपाची बदनामी होऊ लागली आहे.

मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी सेठच्या विषयाला गांभीर्याने घेत नगररचना विभागात लक्ष घातले आहे. मनपा आयुक्तांनी अवघ्या अडीच महिन्यात उपायुक्त अविनाश गांगोडे यांच्याकडील पदभार सलग दुसऱ्यांदा काढून घेतला आहे. दिघेश तायडे यांच्याकडील सहायक संचालक, नगररचना विभाग यांच्याकडील बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र व इतर दाखल्यांचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत. यासोबतच अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांच्याकडील आरोग्य विभागाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. तायडे यांना चर्चेतला शेठ, तर गांगोडे यांना अतिक्रमण प्रकरण भोवले आहे.

मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी सहायक संचालक, नगररचना यांच्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले. प्रशासक काळातील आयुक्तांनी तिसऱ्यांदा विभागात बदल केले आहे. आयुक्तांनी स्वतःकडे घेतला आहे. मनपा आयुक्तांनी नगररचना विभागात भाकरी फिरवली असली तरी सेठ मात्र अद्याप आझाद आहे. सेठ पुन्हा आपली कामे मार्गी लावण्यासाठी कुण्या दुसऱ्या अधिकाऱ्याला आपली जाळ्यात ओढतील यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button