खान्देशजळगांवराजकीय

…म्हणून रोहित निकमांच्या उमेदवारीचा होईल विचार!

खान्देश टाइम्स न्यूज | जकी अहमद | जळगाव जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले असून सर्वच राजकीय पक्षात उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मविआ आघाडीत जळगाव लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला आली असून दुसरीकडे भाजपच आपला हक्क कायम ठेवून आहे. आघाडीकडून थेट भाजपच्या ललिता पाटील यांनी उमेदवारी मागितल्याने मूळ भाजपामध्ये सध्या चर्चेत असलेल्या चेहऱ्यात माजी आ.स्मिता वाघ यांच्या ऐवजी रोहीत निकम यांच्या नावाचा विचार होऊ शकतो अशी शक्यता आहे. एकाच तालुक्यातून दोन महिला उमेदवार देण्याची शक्यता कमी असल्यानेच ललिता पाटलांची उमेदवारी भाजप उमेदवाराच्या पथ्यावर पडेल अशी चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून लवकरच आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर असे दोन मतदार संघ असून दोन्ही ठिकाणी भाजपची मजबूत पकड आहे. गेल्या काही वर्षापासून दोन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. यंदा राज्यात दोन्ही पक्षात फूट पडल्याने उमेदवारी देण्याचा तिढा निर्माण झाला आहे. भाजप युतीच्या बाबतीत फारसा गोंधळ नसला तरी आघाडीत मात्र काही जागा इतरांच्या वाट्याला सोडाव्या लागल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला तर रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सुटली आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे गेल्यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. ऐनवेळी उमेदवारी मिळून देखील मोदी मॅजिकमुळे उन्मेष पाटलांची सरशी झाली होती. उन्मेष पाटील हे मूळ चाळीसगावचे असल्याने गेल्या पाच वर्षात ते मतदार संघात दिसलेच नाही अशी ओरड होऊ लागली. इतकंच काय तर जळगाव शहरात देखील त्यांनी स्वतःचे कार्यालय वर्षभरापूर्वी उघडले. माजी खा.ए.टी.नाना पाटील यांची उमेदवारी कापल्यानंतर अगोदर माजी आ.स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर झाली आणि नंतर दुसऱ्या यादीत त्यांच्या ऐवजी उन्मेष पाटील यांची वर्णी लागली होती. उन्मेष पाटील आपल्या मतदारसंघात फारसा प्रभाव पाडू शकले नसून त्यामुळे त्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. उन्मेष पाटील यांच्या जागी दमदार युवा चेहरा देण्याचा भाजपचा विचार आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघातून सध्या विद्यमान खा.उन्मेष पाटील, माजी खा.ए.टी.नाना पाटील, माजी आ.स्मिता वाघ, जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. जळगाव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि पक्षीय समीकरणे लक्षात घेता सर्वपरिचित आणि तरुण चेहरा देणे अपेक्षित आहे. नुकतेच भाजपच्या महिला पदाधिकारी, अमळनेरवासी ललिता पाटील यांनी थेट शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली असून उमेदवारीची मागणी केली आहे. उध्दव ठाकरे यांनी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराला सहकार्य करणार का? अशी कार्यकर्त्यांना थेट विचारणा केली असता त्यांनी देखील होकार दर्शवला आहे. उध्दव ठाकरेंच्या प्रश्नाने ललिता पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

ललिता पाटील या मूळ अमळनेरकर असून भाजपकडून इच्छूक असलेल्या माजी आ.स्मिता वाघ देखील अमळनेरच्या आहे. अमळनेर, पारोळा, पाचोरा, जळगाव ग्रामीण मतदार संघातील विद्यमान आमदार दुसऱ्या गटात गेल्याने जनतेची नाराजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला फायदेशीर ठरू शकते. त्यातच अमळनेर तालुक्यातून एक महिला उमेदवार असल्याने भाजप आपला उमेदवार देखील त्याच मतदार संघातील देईल यात साशंकता असल्याने स्मिता वाघ यांची शक्यता धूसर होते. तसेच स्मिता वाघ यांनी आजवर पक्षात अनेक पदांवर जबाबदारी निभावली असल्याने पुन्हा त्यांनाच खासदारपदी बढती देण्याऐवजी पक्ष इतर कुणाचा विचार करेल अशी शक्यता जास्त आहे.

माजी खा.ए.टी.नाना पाटील हे भाजपचे असले तरी ते मधल्या काळात लांब असल्याने त्यांचा पुन्हा विचार होईल याची शक्यता फारशी नाही. विद्यमान खा.उन्मेष पाटील यांचे तर रिपोर्ट कार्डच निगेटिव्ह असल्याचे बोलले जात असल्याने भाजपकडून एकमेव चेहरा म्हणून रोहित निकम यांची वर्णी लागू शकते. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघ म्हणजे भाजपचे हक्काचे मतदार संघ असल्याने दोन्ही ठिकाणी भाजप मंत्री ना.गिरीश महाजन किंवा आ.मंगेश चव्हाण यांच्या सारख्या नेत्यांना केंद्रात पाठवून राज्यात खड्डा करण्याची चूक करणार नाही. रोहित निकम हे सध्या सर्वांच्या आणि विशेषतः भाजप युतीच्या नेत्यांच्या जवळील युवा नेते म्हणून ओळखले जात असून त्याचाच फायदा त्यांना होणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात रोहित निकम यांना उमेदवारी मिळाल्यास मराठा समाज, जळगाव शहरवासी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वच बाबी जोपासल्या जातील हे निश्चित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button