अनिलभाऊंसाठी प्रचारात उतरले माजी आमदार संतोषभाऊ चौधरी
गावागावात प्रमुखांच्या भेटीगाठी, ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क
खान्देश टाइम्स न्यूज l रावेर l १८ नोव्हेंबर २०२४ l संपूर्ण हिंदुस्तानचे दैवत प्रभू श्रीरामचंद्र हे भाऊ लक्ष्मणासाठी धावून गेले होते. राजकारणाच्या युद्धात प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचारार्थ माजी आमदार संतोष चौधरी देखील मैदानात उतरले आहे. पक्षीय राजकारण बाजूला सारत संतोष चौधरी जोमाने प्रचाराला लागले असून रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा गट आहे.
रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांचा ग्रामीण भागात प्रचार सुरु असून बॅट हे त्यांचे चिन्ह आहे. अनिल चौधरी यांचे मोठे बंधू माजी आमदार संतोष चौधरी हे देखील भावाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून गावागावाना भेटी देत आहे. आपल्या परिचयातील व्यक्तींच्या आणि ग्रामस्थांच्या भेटी घेऊन ते अनिल चौधरी यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन करीत आहे.
ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क
संतोष चौधरी आमदार असताना त्यांचा मतदारसंघ बराच मोठा होता. भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या रावेर-यावल विधानसभा मतदार संघाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. भुसावळचे नगराध्यक्ष आणि अनेक वर्ष लोकप्रतिनिधी असल्याने त्यांचा दांडगा जनसंपर्क यावल, फैजपूर, रावेर परिसरात आहे. ग्रामीण भागातील अनेक मतदार संतोष चौधरी यांना मानणारे असून अनेक वर्षांपासून त्यांच्या संपर्कात आहेत.
जनतेमध्ये चौधरींची मोठी क्रेझ
माजी आमदार संतोष चौधरी आपल्या बिनधास्त स्वभाव आणि बेधडक शैलीमुळे सर्वांना चांगलेच परिचित आहेत. अनेक दिग्गज लोकप्रतिनिधींना ते सडेतोड उत्तर देत असतात. संतोष चौधरी आणि अनिल चौधरी यांच्या खमक्या स्वभावामुळे दोन्ही भावंडांची मतदारसंघात मोठी क्रेझ आहे.
लोकसभेला अनिल चौधरींनी घेतली होती बाजू
नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीप्रसंगी संतोष चौधरी यांचे नाव रावेर लोकसभा मतदारसंघातून चर्चेत आले होते. संतोष चौधरी हे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात होते आणि अनिल चौधरी हे प्रहार जनशक्ती पक्षात होते. दोघांचे पक्ष विभिन्न असले तरी भावाची बाजू घेत अनिल चौधरी ठामपणे समोर आले आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. दोन्ही भाऊ एकमेकांसाठी नेहमी धावून येत असून त्यामुळेच त्यांची वेगळी छबी जनमानसात आहे.