
पत्नीच्या बाळंतपणाचा बहाणा, फावल्या वेळात चोरी मध्यप्रदेशातील अट्टल चोरटा अखेर जेरबंद
जळगाव एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मध्यप्रदेशातील कुख्यात चोरट्याला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. पत्नीच्या बाळंतपणासाठी जळगावात आलेल्या या गुन्हेगाराने शहरात सोनसाखळी चोरी केल्यानंतर पळ काढला होता. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे १५ दिवस सापळा रचून पोलिसांनी त्याला अखेर पकडले. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
गेल्या काही महिन्यांत जळगाव शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे एलसीबीच्या पथकाने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण करून आणि गुप्त माहितीच्या आधारे माधव श्रावण बोराडे (रा. इंदोर, मध्यप्रदेश) याचे नाव समोर आले.
माधव बोराडे हा मध्यप्रदेशातील अट्टल चोर असून त्याच्यावर तेथील पोलिसांकडेही गुन्ह्यांची नोंद आहे. पत्नीच्या बाळंतपणासाठी तो जळगावात आला होता. रुग्णालयात पत्नीला दाखल करून तो फावल्या वेळात शहरात फिरत सोनसाखळ्या चोरत होता.
इंदोरला पळून गेला पण अखेर जळगावात सापडला
पोलिसांनी इंदोर येथे पाठलाग केला असता माधवने तिथून पळ काढला आणि परत जळगाव गाठले. मात्र, एलसीबीच्या दुसऱ्या पथकाने सकाळपासून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून अखेर ३-४ तासांच्या पाठलागानंतर त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोन सोनसाखळी चोरीची कबुली दिली असून चोरी केलेल्या दोन्ही सोनसाखळ्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
यांनी केली कारवाई
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोउनि शरद बागल, स.फौ. संजय हिवरकर, विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, राजेश मेढे, पो.ह. विजय पाटील, हरीलाल पाटील, अक्रम शेख आदींनी केली.