जळगाव,;- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने एकमेकांमध्ये समन्वय ठेवत काम करावे. संघभावनेने काम करत नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल आत्मीयता निर्माण करा. असा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला दिल्या.
जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड , जिल्ह्यातील सर्व उपविभागीय महसूल अधिकारी, उप विभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख व क्षेत्रीय अधिकारी या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते.
आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावा. मोहरम मिरवणूकीत वाहतूक अडथळा निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात याव्यात. असा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी पोलीस विभागाला केल्या.
वाळू उत्खननाचा आढावा घेतांना श्री.प्रसाद म्हणाले की, अवैध वाळू उत्खननात सहभागी नियमित गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. वाळू उत्खननाचे छायाचित्रे मिळाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. जप्त करण्यात आलेल्या वाळूची विक्री करण्यात यावी.
स्थानिक वादांमुळे विकासकामे थांबली असतील तर तंटामुक्ती समितीच्या सहकार्याने सुसंवाद ठेवत वाद मिटवत विकासकामांना गती देण्याचे काम प्रशासनाने करावे. तंटामुक्ती व शांतता समितींची पुनर्रचना करण्यात यावी. असा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
समाजकल्याण, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण तसेच मुलींचे वसतिगृह चालविणाऱ्या शासकीय व अनुदानित संस्थांनी मुलींच्या वसतिगृहासाठी महिला अधीक्षकांचीच नियुक्ती करावी. अशा सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील पोलीस पाटीलांची पदे रिक्त राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. पोलीस पाटलांसाठी ग्रामपंचायत मध्ये बसण्यासाठी व त्यांचे दप्तर ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा देण्यात यावी. पोलीस पाटलांना सक्रीय करा. महामार्गालगत असलेल्या हॉटेल, ढाब्यावर अवैध दारू विक्री व पेयास बंदी घालण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाने तातडीने करावे. बालविवाह रोखण्यासाठी पथके तयार करावीत. वनक्षेत्रातील दुर्मिळ लाकडाची तस्करी रोखण्याचे काम पोलीस व वनविभागाने संयुक्तपणे करावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाने सतर्क राहून काम करावे. यासाठी आपदामित्रांना तयार ठेवावे. असा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी यावेळी दिल्या. पोलीस अधीक्षक एम.राजकुमाय यांनी ही पोलीस प्रशासनाल सूचना केल्या.