खान्देश टाइम्स न्यूज | ३ ऑगस्ट २०२३ | भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील ७ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृतदेह मिळाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्ह्याची उकल करण्यात एलसीबीला यश मिळाले आहे. या प्रकरणी मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार गावातच राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान या नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या असून पुढील तपासासाठी भडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या म्हणत आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी काहींनी दगडफेक देखील केली.
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील ७ वर्षीय मुलगी रविवार दि. ३० रोजी सायंकाळी घरी मिळून न आल्याने मुलीच्या अपहरणाची तक्रार पालकांनी पोलीस स्टेशनला केली होती. त्यानंतर मंगळवारी दोन दिवसांनी १ ऑगस्ट रोजी मुलीचा कुजलेला मृतदेह त्यांच्या घराजवळील शेतकऱ्यांच्या कडबा कुटीत मिळून आला होता. गावातील महिला व नातेवाईकांनी भडगाव पोलीस स्टेशन गाठून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा घेतला होता.
दरम्यान, गावातीलच तरुण स्वप्नील विनोद पाटील (वय १९, रा. गोंडगाव ता. भडगाव) याच्यावर पोलिसांना संशय आला. ज्या कडब्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला ती कुट्टी गोठ्यात होती. हा गोठा स्वप्नील पाटील याचा होता. त्याच्यावर संशय बळावल्याने त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक सखोलपणे चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला. ३० रोजी दुपारी सदर मुलीला आमिष दाखवून संशयिताने त्याच्या गोठ्यात तिला बोलाविले. नंतर नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर प्रकरण उघड होऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्यावर दगड मारून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह त्याने गोठ्यातील कडब्याच्या कुट्टीखाली लपवून ठेवला होता. दरम्यान दोन दिवसांनी ग्रामस्थांना उग्र वास आल्याने प्रकरण उघड झाले.
एलसीबीने संशयित आरोपी स्वप्नील विनोद पाटील याला अटक केली. पोलिसांनी त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यावर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला भडगाव पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पो. अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी अभयसिंह देशमुख, एलसीबीचे पोनि किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपूत, पीएसआय गणेश वाघमारे, गणेश चौबे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, प्रितम पाटील, अनिल जाधव, किशोर राठोड, महेश पाटील, हरिश परदेशी, हेमंत पाटील, किरण चौधरी, प्रमोद ठाकुर, भरत पाटील, ईश्वर पाटील आदींच्या पथकाने तपासात यशस्वी कामगिरी केली आहे.
दरम्यान, दुपारी संशयिताला न्यायालयात घेऊन जात असताना ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. जमाव संतप्त झाल्यानंतर काहींनी आरोपीच्या दिशेने दगडफेक देखील केली असून त्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.