
पाळधीतील नुकसानग्रस्तांना न्याय कधी मिळणार? ; एकता संघटनेचा सवाल
पाळधी प्रतिनिधि
येथे नववर्षाच्या पहाटे काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या २५ दुकाने लुटून जाळून खाक केली होती. प्रशासनाने पंचनामे केले, आंदोलने झाली, आश्वासनही दिले, परंतु तीन महिने उलटले तरी अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.
याच महाराष्ट्रात १७ मार्च रोजी नागपूरमध्ये दंगल झाली. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांत २३ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांना चार दिवसांत भरपाई मिळेल, असे आश्वासन दिले. एवढेच नव्हे, तर दंगलखोरांची मालमत्ता जप्त करून नुकसान भरपाई दिली जाईल, असेही जाहीर केले. समाजकंटकांच्या घरांवर बुलडोझरही चालवण्यात आला.
मग नागपुरातील तोच कायदा पाळधीसाठी का लागू केला जात नाही? असा सवाल उपस्थित करत एकता संघटनेने जिल्हा दंडाधिकारी जळगाव तसेच मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जळगाव विभाग येथे प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन सादर केले आहे.
एकच न्याय सर्वांसाठी हवा
“समाजकंटकांना जात-धर्म नसतो. परंतु शासन सर्व जाती-धर्मांसाठी समान आहे. त्यामुळे नागपुराप्रमाणेच पाळधीतील नुकसानग्रस्त दुकानदारांनाही त्वरित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांनी मांडली आहे.
शिष्टमंडळाचा सहभाग
या निवेदनासाठी एकता संघटनेच्या शिष्टमंडळात फारूक शेख, सय्यद चांद, आरिफ देशमुख, हाफिज रहीम पटेल, अन्वर खान, अनिस शहा, समशेर खान, रईस पिंजारी यांचा समावेश होता.