
वयोवृद्धांची फसवणूक करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !
२५ हजाराच्या रोकडसह रिक्षा जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी पोलिसांनी वयोवृद्ध नागरिकांना रिक्षात बसवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यातील २५ हजार रुपये रोख व चोरीसाठी वापरलेली रिक्षा जप्त केली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दि. २९ मार्च २०२५ रोजी फिर्यादी शेख फिरोज शेख शादुल्ला (वय ५०, रा. नांदुरा, जि. बुलढाणा) हे जळगावच्या अजिंठा चौफुली येथे नांदुराला जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होते. त्यांच्याकडे एका प्लास्टिकच्या पिशवीत २५,००० रुपये रोख होते. यावेळी एका रिक्षाचालकाने त्यांना खामगावला जात असल्याचे सांगितले आणि रिक्षात बसण्यास सांगितले. काही अंतर गेल्यानंतर मागे बसलेल्या प्रवाशांनी फिर्यादीला बसायला जागा नसल्याचे सांगून त्यांना खाली उतरवले. यावेळी फिर्यादीने त्यांच्या पिशवीकडे पाहिले असता, ती कापलेली दिसली व त्यातील रोख रक्कम गायब होती. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जळगाव शहरात वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नेत्रम’ प्रकल्प सुरू केला आहे. याअंतर्गत शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांना पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहे. अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिले.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेत्रम प्रकल्पातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित रिक्षा आढळून आली. पोलिसांनी वसीम कय्युम खाटीक (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तौसीफ खान सत्तार खान (रा. रामनगर, मेहरुण, जळगाव) आणि एका अल्पवयीन साथीदारासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तौसीफ खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरीसह तीन गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. त्यांच्याकडून फिर्यादीचे २५ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली बजाज कंपनीची रिक्षा (MH19-CW-5250) जप्त करण्यात आली आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन: ही यशस्वी कारवाई नेत्रम प्रकल्पामुळे शक्य झाली. जळगाव शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही बसवून नेत्रम प्रकल्पाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.