जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड; ६१ सिलेंडर जप्त

जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड; ६१ सिलेंडर जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील आसोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात घरगुती गॅसचा गैरवापर करून खासगी वाहनांत भरण्याचा गोरखधंदा उघडकीस आला आहे. शनिपेठ पोलिसांनी मंगळवार, १७ जून रोजी दुपारी दीड वाजता कारवाई करत तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करत ६१ सिलेंडर आणि साहित्य जप्त केले.
शहरात घरगुती गॅसचा काळाबाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. या कारवाईत ३३ घरगुती आणि २८ व्यावसायिक सिलेंडर असा एकूण ६१ सिलेंडर जप्त करण्यात आले. यासोबतच गॅस हस्तांतरासाठी वापरले जाणारे वजन काटा, वाहन, व अन्य साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईनंतर राहुल नारायण सोनवणे (वय २९), राकेश नारायण सोनवणे (वय २५), दोघेही रा. पिवळी भिंत, मोहन टॉकीज परिसर, तसेच आदेश राजू पाटील (वय २३, रा. मोहन टॉकीज परिसर) यांच्याविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.