
अमळनेर : शहरातील प्रताप मिल कंपाऊंडमधून दुचाकी चोरणाऱ्या एका तरुणाला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेली दुचाकीही हस्तगत केली आहे.
शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, प्रताप मिल कंपाऊंडमधील रहिवासी राजेंद्र रतनलाल वर्मा यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (एमएच-१९, एएफ ४२५५) ही दुचाकी ३१ जुलै रोजी दुपारी दीड वाजता चोरीला गेली होती. त्यांनी घरासमोर हँडल लॉक करून गाडी उभी केली असताना, अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.
या घटनेनंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल अशोक साळुंखे, मिलिंद सोनार, विनोद भोई, नीलेश मोरे, विनोद संनदानशिव आणि उदय बोरसे यांना तपासाचे आदेश दिले.
पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती काढली. यातून विजय भाईदास भील (वय १९, रा. एकरुखी) याने ही दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला एकरुखी येथून अटक केली. चौकशीत त्याने ती दुचाकी डुबकी मारुती मंदिर परिसरात लपवल्याची कबुली दिली.
पोलिसांनी ती दुचाकी हस्तगत केली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करत आहेत.





