खान्देशजळगांवसामाजिक

जळगाव जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नियमित कर्जदारांना व्याजातून मिळणार मुक्ती!

जळगाव जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नियमित कर्जदारांना व्याजातून मिळणार मुक्ती!

​३१ मार्चपर्यंत कर्जफेड करणाऱ्यांना ६४ कोटींच्या व्याजाची सवलत; १.६४ लाख शेतकरी ५० हजारांच्या अनुदानासाठी पात्र

​जळगाव | प्रतिनिधी
आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एप्रिल २०२५ मध्ये पीककर्ज घेतलेल्या आणि वेळेवर परतफेड करणाऱ्या जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ८६५ नियमित कर्जदार शेतकऱ्यांकडून बँक यावर्षी व्याज आकारणार नाही, अशी ऐतिहासिक घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सोमवारी केली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे ६४ कोटी ३२ लाख रुपयांचा थेट आर्थिक दिलासा मिळणार आहे.

३१ मार्चची मुदत अन् ५० हजारांचे अनुदान
​बँकेने जाहीर केलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत आपल्या पीककर्जाची परतफेड करणे अनिवार्य आहे. निर्धारित मुदतीत कर्जाचा भरणा करणारे शेतकरीच राज्य शासनाच्या वतीने जून महिन्यात दिल्या जाणाऱ्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मुदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

कर्जवाटपात पारदर्शकता; सोसायट्यांना महत्त्वाचे स्थान
​संचालक मंडळाच्या बैठकीत कर्जवाटप प्रक्रियेबाबतही एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विकास सोसायट्यांना डावलून थेट फायनान्स न देता, यापुढे सोसायटीमार्फतच कर्जवाटप केले जाणार आहे. या निर्णयामुळे कर्जवाटप प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल आणि स्थानिक स्तरावरील सोसायट्यांचे महत्त्व अबाधित राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
थकबाकीदार आणि कर्जमाफीचा लेखाजोखा
​राज्य शासनाच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेचा तपशीलही यावेळी देण्यात आला. जिल्ह्यात दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेले ८१ हजार ३९४ शेतकरी असून त्यांच्याकडे ४१० कोटींहून अधिक रक्कम (मुद्दल + व्याज) थकीत आहे. तसेच दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या १० हजार ८६१ शेतकऱ्यांकडे ५५४ कोटींची थकबाकी आहे. या सर्व शेतकऱ्यांना जून महिन्यात कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा शासनाने केली आहे.

गटसचिवांच्या पगाराचा तिढा सुटला
​गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला २४५ गटसचिवांच्या पगाराचा प्रश्नही अखेर मार्गी लागला आहे. थकीत ७ कोटी ६७ लाख रुपयांचे पगार जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत विकास सोसायट्यांना ‘फिक्स लोन’ देऊन पूर्ण केले जाणार आहेत. यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

​”नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हे बँकेचे आद्य कर्तव्य आहे. शेतकऱ्यांवरील व्याजाचा बोजा कमी करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही ही व्याजातून सवलत देण्याची योजना राबवत आहोत.”
– संजय पवार, अध्यक्ष, जिल्हा बँक, जळगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button