
“गरिबांची चूल पेटवा”; प्रा. सोहेल अमीर शेख यांचे भावनिक आवाहन
ईदमिलन सोहळ्यात प्रेम, बंधुत्वाचा संदेश
उमरखेड (प्रतिनिधी) : “काही पेटवण्याची इच्छा असेल तर गरिबांची चूल पेटवा,” असे भावनिक आवाहन करत समाजात शांतता, प्रेम आणि बंधुत्व वाढवण्याचा संदेश प्रा. सोहेल अमीर शेख यांनी दिला. ते जमाअत-ए-इस्लामी हिंद, उमरखेडच्या वतीने आयोजित ईदमिलन सोहळ्यात बोलत होते. हा कार्यक्रम स्थानिक अनंतराव देवसरकर सभागृहात पार पडला.
प्रा. शेख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मने जुळण्यासाठी परस्परांशी जवळीक आणि आदर आवश्यक आहे. सर्व मानव एकाच निर्मात्याची लेकरे असून, एकमेकांचा सन्मान करणे हाच इस्लामचा मूलभूत संदेश आहे. समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ईशभय आणि नैतिक मूल्यांची जाणीव असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
रोजाच्या आध्यात्मिक पैलूंवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, रोजा म्हणजे संयम आणि आत्मनियंत्रण. जर माणूस वर्षभर वाईट सवयी आणि चुकीच्या मार्गापासून दूर राहिला, तरच रोजाचे खरे उद्दिष्ट साध्य होते. प्रत्येकाने आपण ईश्वराच्या देखरेखीखाली आहोत, ही जाणीव ठेवली तर समाजातील गुन्हेगारी आणि द्वेष कमी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात प्रेम आणि बंधुत्व असलेला भारत घडवण्याची प्रार्थना करण्यात आली. यावेळी भंते किर्ती बोधी, अकील मिर्झा, शेख नईम, हनुमंतराव गायकवाड, विजय बेतेवाड, शंकर पांचाळ, शिवाजीराव वानखेडे, विजय रेघाटे, डॉ. आशिष खांबाळकर, डॉ. दळवी, प्रा. धनराज तायडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




