
चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कारवाई; भुसावळातील मारहाण प्रकरणात दोघांना अटक
आईने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव ;प्रसारमाध्यमांमुळे तपासाची चक्रे फिरली
भुसावळ | प्रतिनिधी
चार महिन्यांपूर्वी १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या घटनेत अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रकरणातील संशयितांवर कारवाई होत नसल्याने पीडित तरुणाच्या आईने सातत्याने पाठपुरावा केला. अखेर १३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती देत दोन तरुणांना अटक केली.सिद्धेश महाडीक (१९) आणि सागर साळुंखे (१९) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याशिवाय प्रकरणातील दोन अल्पवयीन बालकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान प्रसारमाध्यमनामध्ये पीडित तरुणाच्या आईने कैफियत मांडल्यानंतर विविध प्रसारमाध्यमांतून या घटनेला वाचा फोडल्यामुळे अखेर पोलीस यंत्रणा खळबळून जागी झाल्याने तपासाची चक्रे वेगात फिरली.
व्हिडिओने उघड केला घटनाक्रम
२३ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर २४ एप्रिल रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली. व्हिडिओतील तांत्रिक पुरावे आणि पीडिताच्या आईच्या पुरवणी जबाबाच्या आधारे गुन्ह्यात BNS १४०(१), १२७(२), IT Act ६६(E) आणि ६७ ही वाढीव कलमे जोडण्यात आली.
दोन अल्पवयीन बालकांवर कारवाई
१७ वर्षे ११ महिन्यांच्या मुख्य संशयित बालकाला यापूर्वीच बाल सुधारगृहात हजर करण्यात आले आहे. तर दुसऱ्या १७ वर्षीय बालकाला आज बाल सुधारगृहात पाठविण्यात आले.दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची पुढील कायदेशीर रिमांड प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.





