
उन्हाळ्यात पाणी-वीजपुरवठा अखंडित ठेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्पष्ट निर्देश
जिल्ह्यात टँकरची गरज नाही; १४ विहिरी अधिग्रहित, पाणीटंचाईवर नियंत्रण
जळगाव : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी व वीजपुरवठा ही अत्यावश्यक सेवा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित पाणीटंचाई व वीजपुरवठा आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत सोनवणे, अनिल पाटील, अमोल जावळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी महावितरणला पाणीपुरवठा योजनांमध्ये वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले. तसेच जलजीवन मिशनअंतर्गत येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देशही दिले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पाणीस्थिती सध्या नियंत्रणात असून प्रमुख प्रकल्पांमध्ये सुमारे ४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा एप्रिलपर्यंत एकही टँकर सुरू करावा लागलेला नाही, तर १४ ठिकाणी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अपूर्ण पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासह अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आले.




