खान्देशजळगांव

लाचखोरीला लगाम : योजनांच्या नावाखाली पैसे उकळणारी महिला जेरबंद

लाचखोरीला लगाम : योजनांच्या नावाखाली पैसे उकळणारी महिला जेरबंद

घरगुती संच वाटपात ‘कमिशन’ची मागणी उघड; एसीबीची सापळा कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरगुती उपयुक्त संच वाटपाच्या कामात लाच मागणाऱ्या एका महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने शासकीय योजनांतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे. या कारवाईमुळे लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

केवायसीसाठी १०० रुपयांची मागणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनेतून लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित महिला आसमा परवीन शेख इरफान (वय ३८) हिने तक्रारदाराकडे केवायसी प्रक्रियेसाठी १०० रुपयांची लाच मागितली होती. या प्रकारामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

सापळा रचून रंगेहात  अटक

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचला. पंचांसमक्ष आरोपी महिलेला १०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईदरम्यान आरोपीकडून तब्बल ४७ हजार २५० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून, ती इतर लाभार्थ्यांकडून उकळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा

या प्रकरणी जळगाव येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील व पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत.

नागरिकांना एसीबीचे आवाहन

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास तत्काळ तक्रार करावी, जेणेकरून अशा प्रकारांवर वेळीच कारवाई करता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button