
रेड क्रॉस सोसायटीकडून मनपाचा भूखंड बळकावण्याचा प्रयत्न?
रात्रीतून भिंत पाडल्याने जळगावात खळबळ ; ॲड. पियुष पाटील यांची महापौरांकडे लेखी तक्रार
जळगाव | प्रतिनिधी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या शेजारी असलेल्या महानगरपालिकेच्या मालकीच्या कोट्यवधींच्या आरक्षित भूखंडावर डल्ला मारण्याचा प्रयत्न रेड क्रॉस सोसायटीकडून केला जात असल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. संस्थेने रात्रीच्या अंधारात मनपाच्या मालकीची संरक्षण भिंत अनधिकृतपणे तोडून या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष पाटील यांनी महापौर आणि आयुक्तांकडे केली आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू असताना काही वेस्ट मटेरियल टाकण्यासाठी मनपाच्या या खुल्या भूखंडाची ५ फूट भिंत तोडण्यात आली होती. मात्र, हे काम पूर्ण होत आल्यावरही भिंत पूर्ववत बांधण्यात आली नाही. याच संधीचा फायदा घेत इंडियन रेड क्रॉस सोसायटीने रात्रीच्या वेळी चक्क १५ ते २० फूट कंपाउंड भिंत तोडली आणि जेसीबीच्या सहाय्याने त्या जागेचे सपाटीकरण केले. इतकेच नव्हे तर, या अनधिकृत जागेवर संस्थेची वाहने उभी करून पार्किंगसाठी वापर सुरू केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
कुटील डाव उधळण्याचा इशारा
यापूर्वी देखील रेड क्रॉस सोसायटीच्या संबंधित काही व्यक्तींनी या जागेवर स्वतःच्या संस्थेचा ‘लोगो’ असलेले गेट बसवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्याने तो डाव फसला होता. आता पुन्हा एकदा भिंत तोडून जागा बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याने ॲड. पियुष पाटील यांनी महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि उपायुक्तांकडे लेखी तक्रार देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.
संस्थेच्या ‘काळ्या धंद्यांचा’ पर्दाफाश करणार: ॲड. पाटील
“इंडियन रेड क्रॉस सोसायटी ही देशातील एक मोठी संस्था असून तिच्याकडे कोट्यवधींच्या ठेवी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्याज मिळत असतानाही मनपाचा मोकळा भूखंड बळकवण्यासाठी हा खटाटोप कशासाठी?” असा सवाल ॲड. पियुष पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आगामी काळात रेड क्रॉस सोसायटी संदर्भातील अनेक गैरप्रकार जनतेसमोर आणणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या तक्रारीमुळे आता जळगाव महानगरपालिका प्रशासन संबंधित भूखंडाबाबत कोणती भूमिका घेते आणि अनधिकृतपणे भिंत तोडणाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.




