
“महा आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा” — जिल्हाधिकारी रोहन घुगे
मुख्यमंत्री सहायता निधीच्या महा आरोग्य शिबिरासाठी नियोजन बैठक संपन्न
जळगाव, — : “महा आरोग्य शिबिर शहरात होत असले तरी ते जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी खुले असून अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा तसेच सर्व संबंधित संस्थांनी समन्वयातून काम करावे ,” असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, जळगाव यांच्या वतीने महा आरोग्य शिबिराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन व सामंजस्य कराराबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत महापौर श्रीमती दीपमाला काळे, आमदार सुरेश भोळे , जिल्हाधिकारी रोहन घुगे व निवासी जिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण उपस्थित होते. तसेच या बैठकीस मुख्यमंत्री सहायता निधी संलग्नित रुग्णालये, धर्मदाय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, दानशूर व्यक्ती तसेच आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील यांनी मागील वर्षभरातील कार्याचा आढावा सादर केला. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच यापूर्वी आयोजित महा आरोग्य शिबिरांच्या यशस्वी अंमलबजावणीचा अनुभवही त्यांनी मांडला.
आमदार सुरेश भोळे यांनी हा उपक्रम शासकीय असला तरी सर्वांनी एकत्रितपणे टीमवर्कच्या माध्यमातून राबविणे आवश्यक असल्याचे नमूद केले. महापौर श्रीमती दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक सर्व संसाधने व सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सिद्धार्थ चौधरी यांनी केले.





