
शेतकऱ्यांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड होणार नाही’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव विमानतळ विस्तारीकरणाला गती; प्रकल्पग्रस्तांना न्याय, शेतरस्ते आणि बाधित रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश
चिंचोली–नशिराबाद–उमाळा रस्त्यासाठी ₹६.६० कोटींचे काम प्रगतिपथावर; नशिराबाद नगर परिषदेच्या सुमारे ₹१२.५० कोटींच्या थकीत मालमत्ता कराबाबत लवकरच स्वतंत्र बैठक
जळगाव : जळगाव विमानतळाचा विकास आणि विस्तारीकरण ही जिल्ह्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, विकास करताना ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. विमानतळाचा विकासही झाला पाहिजे आणि माझ्या शेतकरी बांधवांच्या हक्कांचेही संरक्षण झाले पाहिजे. विकासामुळे बाधित होणारे रस्ते, शेतकऱ्यांचे ये-जा करण्याचे मार्ग आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा,” असे स्पष्ट निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जळगाव विमानतळ विकास व विस्तारीकरण प्रकल्पातील प्रलंबित प्रश्न, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच विमानतळ परिसरातील विविध विकासकामांचा आढावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. विमानतळ विकासाच्या प्रत्येक कामाला गती देतानाच नशिराबाद, चिंचोली, उमाळा, कुसुंबा व परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार झाल्याशिवाय मोठ्या प्रमाणावर विमानसेवा वाढण्याला मर्यादा आहेत. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रक्रियेला आवश्यक गती देणे गरजेचे आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गाचे सौंदर्य आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून (DPDC) अजिंठा चौफुली ते विमानतळापर्यंत सौर पथदिव्यांसाठी ₹५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
जमीन मोजणी तातडीने पूर्ण करा
विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक जमीन मोजणीला संबंधित शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शासकीय मोजणीच्या प्रक्रियेत कोणताही अनावश्यक विलंब होऊ नये. विमानतळ प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून मोजणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. संपादित जमिनींशी संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मिळणारी मदत व लाभ वेळेत उपलब्ध करून देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.
₹६.६० कोटींच्या रस्त्याच्या उर्वरित कामाला गती द्या
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून विमानतळ परिसरातील प्ररिमा क्रमांक १०९ वरील सुमारे पाच किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण तसेच चिंचोली–नशिराबाद–उमाळा कच्च्या वहिवाट रस्त्याचे डांबरीकरण व त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी एकूण ₹६ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सदर काम प्रगतिपथावर असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. उर्वरित काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशमार्ग
विमानतळाच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या शेतजमिनींमध्ये शेतकऱ्यांना ये-जा करताना अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी सुमारे दहा फूट रुंदीचा स्वतंत्र प्रवेशमार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विमानतळ प्राधिकरणाला दिले. या मागणीबाबत विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली. विमानतळाच्या भिंतीमुळे शेतकऱ्याचा त्याच्या शेताकडे जाणारा रस्ता बंद होणे योग्य नाही. विकास हा माणसासाठी आहे; त्यामुळे विकासाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे,” अशी ठाम भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली.
नशिराबाद नगर परिषदेच्या ₹१२.५० कोटींच्या मालमत्ता कराचा प्रश्नही मार्गी लावावा
नशिराबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी १६ एप्रिल २०२५ रोजी जळगाव विमानतळ प्राधिकरणाकडे सुमारे ₹१२.५० कोटींच्या थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसंदर्भात मागणी केली असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला. या प्रश्नावर MRDC व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून तो निकाली काढण्यासाठी १५ दिवसांनंतर स्वतंत्र संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश पालकमंत्री श्री पाटील यांनी दिले. संबंधित प्राधिकरण व विभागांच्या अधिकाऱ्यांना या बैठकीस बोलावून नगर परिषदेच्या मालमत्ता करवसुलीच्या प्रश्नावर ठोस तोडगा काढावा, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांकडून पालकमंत्र्यांचा सत्कार
चिंचोली–नशिराबाद–उमाळा कच्च्या वहिवाट रस्त्याच्या डांबरीकरणासह पुलाच्या बांधकामासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून ₹६.६० कोटींचा निधी उपलब्ध झाला असून काम प्रगतिपथावर असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतरस्त्याच्या प्रश्नाला प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून गती मिळाल्याबद्दल नशिराबाद नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि शेतकरी बांधवांनी बैठकीत पालकमंत्री.गुलाबराव पाटील यांचा सत्कार करून आभार मानले.
बैठकीस वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे ऑनलाइन उपस्थित होते. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, नशिराबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, नगरसेवक विकास पाटील, विकास धनगर, शशिकांत चौबे, चेतन बराटे यांच्यासह नगरसेवक व शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी हर्ष त्रिपाठी , नगरसेवककीर्तिकांत चौबे, शैलाताई व्यवहारे, मनोज पाटील, असलम तनवीर सर, सलीम शाह, सय्यद फिरदोस, ॲड इकबाल, स्वीकृत नगरसेवक प्रदीप बोडरे, संदीप पाटील तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि विमानतळ परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते





