
‘गांजामुक्त’ मोहिमेला मोठे यश; जळगाव पोलिसांनी २.७२ कोटींचा १३६२ किलो गांजा केला नष्ट
२३ गुन्ह्यांतील जप्त मुद्देमालाची विल्हेवाट; एलसीबीच्या कारवाईने अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ
जळगाव : जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून जळगाव जिल्हा पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त केलेला तब्बल २ कोटी ७२ लाख ४० हजार रुपये किमतीचा १३६२ किलो गांजा सोमवारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट केला. जिल्ह्यातील २३ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाच्या विल्हेवाटीमुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
२३ गुन्ह्यांतील मुद्देमालाचा समावेश
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या अंमली पदार्थ कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्ये हा गांजा जप्त करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी या सर्व मुद्देमालाचा आढावा घेत तो नष्ट करण्याचा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर केला होता. समितीची मंजुरी मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.
दोन टप्प्यांत पार पडली प्रक्रिया
सोमवारी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत गांजा नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने खड्डा खोदून गांजाची विल्हेवाट लावण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर, कृषी विभागाचे विकास बोरसे, निरीक्षक राजेंद्र व्यवहारे उपस्थित होते.
एलसीबी पथकाची महत्त्वपूर्ण भूमिका
पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार संजय दोरकर, पोहेकॉ संदीप पाटील, जयंत चौधरी, अजय पाटील, रवींद्र चौधरी यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
“जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असून युवकांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी पोलिसांचा विशेष भर राहणार आहे.”
— श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, जळगाव




