
जळगाव जिल्हा सेपकटकरा संघ निवड चाचणीची घोषणा; २० मे रोजी होणार ट्रायल्स
जळगाव l प्रतिनिधी जळगाव जिल्हा सेपकटकरा असोसिएशनतर्फे आगामी ३६ वी सीनियर व २७ वी ज्युनियर महाराष्ट्र राज्य सेपकटकरा अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ साठी जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी बुधवार, दि. २० मे रोजी सायंकाळी ४ वाजता एम. ए. आर. अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज क्रीडांगण, हाजी अब्दुल गफार मलिक कॅम्पस, प्रताप नगर, जळगाव येथे होणार आहे.
सेपकटकरा हा आग्नेय आशियातील पारंपरिक खेळ असून यात पाय, डोके, छाती आणि गुडघ्यांच्या सहाय्याने रतनचा चेंडू जाळीपलीकडे प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात टाकला जातो. हा खेळ व्हॉलीबॉलसारखा असला तरी हातांचा वापर करता येत नाही. वेग, चपळता आणि सांघिक कौशल्य यांचा उत्कृष्ट संगम या खेळात पाहायला मिळतो. महाराष्ट्रात या खेळाचा झपाट्याने प्रसार होत असून राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
निवड चाचणीमध्ये मुले व मुली असे दोन्ही गट सहभागी होणार आहेत. केवळ जळगाव जिल्हा सेपकटकरा असोसिएशनकडे २०२६-२७ सत्रासाठी नोंदणी केलेले खेळाडूच पात्र राहतील. ज्युनियर गटासाठी खेळाडूचा जन्म १ जानेवारी २००८ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. सहभागी खेळाडूंनी मूळ जन्म दाखला, आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट फोटो सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना ४ ते ७ जून २०२६ दरम्यान नागपूर येथील मानकापूर स्टेडियम, विभागीय क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
निवड चाचणीसंदर्भात अधिक माहितीसाठी मिर्झा आसिफ इक्बाल (९०२१२२३४५२), फैजान शेख (९३७२९२७२११) आणि आमिर खान (९८३४५६१३६५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व खेळाडूंनी संपूर्ण क्रीडा गणवेश, स्पोर्ट्स शूज आणि स्वतःचे पिण्याचे पाणी सोबत आणावे. उशिरा येणाऱ्या खेळाडूंना चाचणीत सहभागी होता येणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एजाज मलिक, प्रा. डॉ. चंद्रकांत सोनवणे, डॉ. प्रदीप तळवलकर, इकबाल मिर्झा, वसीम मिर्झा आणि प्रशांत जगताप यांनी केले आहे.




