
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त; अफवांवरही राहणार करडी नजर
संवेदनशील ठिकाणी वाढवली गस्त; सोशल मीडियावर लक्ष ठेवणार
जळगाव l प्रतिनिधी आगामी बकरी ईद आणि इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष तयारी सुरू केली आहे. संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार असून सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस दलाकडून देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह महानगरपालिका, आरोग्य विभाग, महावितरण, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी आणि मुस्लिम समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.
अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात
सण शांततापूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. एसआरपीएफ जवान तसेच होमगार्ड पथकांची नियुक्ती करण्यात येणार असून प्रमुख चौक, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे.
‘गुड मॉर्निंग स्क्वॉड’ अलर्ट
संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यासाठी ‘गुड मॉर्निंग स्क्वॉड’ अलर्ट करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
नाकाबंदी आणि तपासणी सुरू
जिल्ह्यात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करून तपासणी नाके सक्रिय करण्यात आले आहेत. संशयित वाहनांची आणि व्यक्तींची कसून तपासणी सुरू असून पोलिसांकडून सतर्कता वाढविण्यात आली आहे.
सोशल मीडियावर विशेष लक्ष
सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश किंवा अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





