
अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात सरावादरम्यान ग्रेनेडचा स्फोट; चार पोलिस जखमी
दंगल नियंत्रण सरावावेळी घडली घटना
अहिल्यानगर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दंगल नियंत्रण आणि जमाव नियंत्रणाच्या सरावादरम्यान प्लास्टिक स्मोक स्टन ग्रेनेड हातातच फुटल्याने चार पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना सोमवारी पोलिस मुख्यालयात घडली. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर दंगल नियंत्रण पथक आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांचा संयुक्त सराव सुरू होता. यावेळी पोलिस अंमलदार शुभम पांडुरंग कावरे, योगेश गणेश साळुंके, शिवराज संजय पवार आणि गणेश मधे हे जखमी झाले.
यातील शुभम कावरे यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शिवराज पवार यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. तर इतर दोघांना किरकोळ इजा झाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार, सराव सुरू असताना जवानांनी ग्रेनेडची पिन काढल्यानंतर त्यावरील लिव्हर पट्टी चुकून खाली पडली. त्यामुळे ग्रेनेडचा हातातच स्फोट झाला.
या घटनेनंतर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे जखमी कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. तसेच या प्रकरणाची पोलिस उपअधीक्षकांमार्फत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित ग्रेनेड हे २०२३ मधील असून ते वापरासाठी योग्य अवस्थेत होते, अशी माहिती राखीव पोलिस निरीक्षक उमेश परदेशी यांनी दिली. तयार केल्यानंतर सात वर्षांपर्यंत हे ग्रेनेड वापरता येतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.





