
एका निवेदनाने खडबडून जागी झाली यंत्रणा; अवैध दारू अड्ड्यांवर उत्पादन शुल्क विभागाचा धडक प्रहार
दोन दिवसांत ३६ गुन्हे दाखल, २२ आरोपी जेरबंद; २२ हजार लिटरहून अधिक रसायन नष्ट
जळगाव | प्रतिनिधी
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू, विषारी रसायनयुक्त मद्यविक्री आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी केलेल्या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभर धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. अवघ्या दोन दिवसांत ३६ गुन्हे दाखल करण्यात आले असून २२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच २२ हजार ७८० लिटर रसायन नष्ट करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शैलेंद्र सपकाळे यांनी २७ मे रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन सादर करून जिल्ह्यात अनेक ठिकाणी रसायन मिश्रित हातभट्टी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप केला होता. या विषारी दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून, व्यसनाधीनतेमुळे गरीब कुटुंबांतील कर्त्या व्यक्तींचे जीवन धोक्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. तसेच गुटखा आणि इतर अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी भरकटत असल्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली होती.
या निवेदनानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. २९ मे रोजी जळगाव कार्यालयाच्या पथकाने जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून ९ गुन्हे दाखल केले. या कारवाईत ८ आरोपींना अटक करण्यात आली असून १७६ लिटर गावठी दारू आणि ४ हजार ३४० लिटर रसायन जप्त करण्यात आले. या कारवाईतील एकूण मुद्देमालाची किंमत १ लाख ८९ हजार ८० रुपये इतकी आहे.
त्यानंतर ३० मे रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, डीडीसी एफएस आणि येवला विभागाच्या संयुक्त पथकाने आणखी व्यापक मोहीम हाती घेतली. या कारवाईत २७ गुन्हे दाखल करण्यात आले असून १४ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच ५७६ लिटर गावठी दारू, ४४ लिटर ताडी, १४.४ लिटर देशी मद्य आणि तब्बल १८ हजार ४४० लिटर रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. या कारवाईत ७ लाख ८१ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दोन दिवसांच्या एकत्रित कारवाईत ३६ गुन्हे दाखल झाले असून २२ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. याशिवाय ७५२ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून एकूण ९ लाख ७० हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या या धडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या कारवाया आगामी काळातही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.





